रत्नागिरी : विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. यावेळी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
स्वत:चा जीव धोक्यात घालून इतर रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील सर्व आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर, २०२१ पासून रद्द केलेला कोविड-१९ प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात यावा, अन्यथा जोपर्यंत हा भत्ता देणार नाहीत, तोपर्यंत त्या कोविडचे काम करणार नाहीत, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला होता.
तसेच १ एप्रिल, २०२१ पासून आशा व गटप्रवर्तक महिलांचे सर्व थकीत मानधन व मोबदला त्वरित मिळावा. २३ जून, २०२१ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आरोग्यवर्धिनीअंतर्गत ज्याठिकाणी अद्याप सीएचओ नेमलेले नाहीत, त्यांची नेमणूक करावी. तसेच नेमणूक होत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणच्या आशांना आरोग्यवर्धिनी कामाचे १ हजार रुपये दरमहा मागील फरकासहीत मिळावेत, सन २००२ सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू असल्याने व सद्यस्थिती विचारात घेता, हा प्रकल्प सुरू राहत असल्याने आशा व गटप्रवर्तकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कर्तव्य बजावत असताना कोरोनाची बाधा झाल्यास १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करा, सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अशा विविध मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश होता.
यावेळी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, पी. पी. पारकर, विद्द्या भालेकर, संजीवनी तिवरेकर, सुप्रिया गवाणकर, गीतांजली जाधव, नयना गोसावी, रेश्मा कदम व अन्य आशा सेविका जिल्हा परिषदेसमोर उपस्थित होत्या.