लाेकमत न्यूज नेटवर्क
पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या करून येणे हे अग्रक्रमाने सांगावे, जेणेकरून येणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहणार नाही आणि प्रत्येकाला उत्सव आनंदाने साजरा करता येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी सांगितले.
पूर्णगड सागरी पोलीस स्थानकातर्फे गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावस येथे दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकते नियम न पाळल्यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसला. त्यामुळे या कालावधीमध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली होती. सध्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, ही घट कायम ठेवण्यासाठी मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला चाचण्या करून येण्यास भाग पाडावे, असे वाघमारे यांनी सांगितले. प्रत्येकाने उत्सव सर्व नियमांचे पालन करून, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येकाने कोणत्याही नियमाला बाधा न येऊ देता, घरोघरी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.
यावेळी माजी सरपंच लाइफ फोडू यांनी काही चाकरमानी अथवा नागरिक यांना काही त्रास जाणवल्यास जवळच्या ग्राम विलगीकरण कक्षात सोय करावी, जेणेकरून त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आम्ही संबंधित ग्राम विलगीकरण कक्ष या दरम्यान पुन्हा सुरू करण्याचे संबंधित यंत्रणेला सांगू, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे सांगितले.
त्यानंतर, मुस्लीम बांधवांतर्फे अश्रफ कप्तान यांनी मुस्लीम बांधवांप्रमाणे हिंदू बांधवही नियमांचे पालन करून गणेशाेत्सव साजरा करतील, अशी ग्वाही पोलीस यंत्रणेला दिले. काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी मंगलमूर्ती सजावट स्पर्धा स्थगित केल्याची माहिती देण्यात आली. विषाणूचा संसर्ग संपुष्टात आल्यानंतर पुन्हा नव्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्पर्धा सुरू होतील, असे आयोजकांनी सांगितले.