गाळ उपसा सुरू
देवरूख : नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने देवडे गावातील काजळी नदी गाळ उपसा प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नदीचे पात्र एक किलोमीटर लांब, ८० मीटर रूंद, दोन मीटर खोल करण्यात येणार आहे. पोकलॅंड नाम फाऊंडेशनने उपलब्ध केेले आहे.
वेदांत महाडिक प्रथम
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयाचा वेदांत महाडिक याने महाराष्ट्र शासनातर्फे ऑनलाईन घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
कामगारांची चाचणी करा
चिपळूण: राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरण, गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण तसेच वाशिष्ठी नवीन पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. हे काम करणारे शेकडो कामगार व मजूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वास्तव्य करत असून, त्यांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, माजी सभापती शाैकत मुकादम यांनी केले आहे.
पशुसंवर्धनावर मार्गदर्शन
रत्नागिरी : तालुक्यातील माेहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे ‘पशुसंवर्धन एक स्वयंरोजगाराचा उत्तम पर्याय’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम झाला. पंचायत समितीचे विकास विस्तार अधिकारी डाॅ. अभिजित कसालकर यांचे मार्गदर्शन लाभले.
भोस्ते येथे वणवा
खेड : तालुक्यातील भोस्ते ग्रामपंचायतीजवळ रविवारी दुपारी ३ वाजण्याच्यादरम्यान अचानक वणवा लागला. तातडीने अग्निशमक बंब बोलावण्यात आला. ग्रुपचे सदस्य मदतकार्यात गुंतले होते. अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली.
व्यावसायिकांचे निवेदन
गुहागर : तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील किराणा माल, कापड दुकान, शिवणकाम, कटलरी, स्टेशनरी, झेराॅक्स सेंटर, लोहारकाम, सलून, पार्लर, हार्डवेअर, इलेक्ट्रिक दुरूस्ती व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी गुहागर तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.
रूपेश घवाले यांची निवड
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेलदूर शाखाध्यक्षपदी रूपेश घवाले यांची निवड करण्यात आली. यावेळी विनोद जानवळकर, विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, कोतळूक शाखाध्यक्ष दिनेश निवाते, पालशेत उपविभाग अध्यक्ष तेजस पोफळे उपस्थित होते.
अनुदानाच्या प्रतीक्षेत
दापोली : तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना वर्ष लोटले,तरी अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही. शासनाकडून ३६ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी अनुदानाच्या रकमेपेक्षा अधिक खर्च केला असून, अद्याप शासकीय अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
सूचना नसल्याने अपघाताचा धोका
देवरूख : तुळसणी ते निवेदरम्यानच्या मार्गावर मोऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे. नागझरी येथील काम वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. काम सुरू असल्याबाबत सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. मात्र, सूचनाफलक नसल्याने काम सुरू असल्याचे वाहनचालकांच्या निदर्शनास येत नाही.