पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सुरकरवाडी स्टॉप ते रामेश्वर मंदिराच्या पुढे लक्ष्मण शिवगण यांचे घर असे खडीकरण व डांबरीकणाचे काम जिल्हा परिषद फंडातून सुरू झाले आहे. मात्र, खडीकरण करण्यापूर्वी रस्त्यावर मारण्यात येणारे डांबरच दिसत नसल्याने ही खडी राहणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्ता दुरूस्तीसाठी आलेला निधी नक्की रस्ता कामासाठीच वापरला जाताेय का, अशी शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.
जिल्हा परिषद सदस्या आरती तोडणकर यांच्या प्रयत्नातून रस्ता दुरुस्तीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम ठेकेदार पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र, रस्ता दुरूस्ती करताना कामाचा याेग्य दर्जा राखला जात नसल्याची बाब समाेर आली आहे.
रस्त्यावर केवळ डांबर शिंपडून वर जाडी खडी पसरवण्यात येत आहे. डांबराचा वापर इतका कमी करण्यात आला आहे की, टाकलेली खडीही पायाने सहज बाजूला हाेते. भंडारवाडीतील ग्रामस्थ शरद पाटील, शेखर पाटील, उल्हास पाटील, शोभा पाटील, बाब्या पाटील यांनी ही गोष्ट गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच मुरलीधर तोडणकर, उपसरपंच स्मिता भिवंदे, ग्रामपंचायत सदस्य सिध्दार्थ तोडणकर, रामेश्वर ग्रुपचे संतोष तोडणकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
बाबू तोडणकर यांनी आचार्य यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून निकृष्ट कामाची माहिती दिली, तसेच या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर असल्याचेही सांगितले. आचार्य यांनी प्रत्यक्ष येऊन कामाची पाहणी केली. मात्र, त्यांनी केवळ पाहणी करून आहे तसचे काम सुरू ठेवण्यास सांगितल्याची माहिती मारुती अनंत पाटील यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.
----------------------------
निधी कुठे मुरला?
ग्रामस्थांनी निकृष्ट कामाबाबत आक्षेप नाेंदवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या रस्ता कामासाठी मंजूर झालेला निधी नक्की कुठे मुरला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला आहे. त्यातच अशा प्रकारचे काम करण्यात आले तर ते पावसाळ्यात टिकणार आहे का, असाही प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर कामाचा दर्जा कसा राहणार, या कामात काहीतरी गाैडबंगाल असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.
--------------------------------
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्ता दुरूस्तीच्या कामात डांबर वापरले की नाही, अशीच शंका येत आहे. केवळ खडी पसरून ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे. (छाया : दिनेश कदम)