रत्नागिरी : बारावी परीक्षेच्या मूल्यांकनाबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवार दि.७ जुलैपासून महाविद्यालयीनस्तरावर शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. दि.२३ जुलैपर्यंत मूल्यमापनाचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने शासनाने परीक्षा रद्द केल्या. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता कनिष्ठ महाविद्यालयांनी दि. ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर दि.१४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत भरल्यानंतर मंडळ स्तरावर अंतिम निकाल तयार करण्यात येणार आहे. गुण ऑनलाईन भरल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांनी ते सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे दि.२१ ते २३ जुलैअखेर सादर करायचे आहेत.
दहावीच्या गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के यावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाणार आहे. दहावीच्या वर्षांचे गुण लक्षात घेताना सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत. जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.