जाकादेवी : रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे खेड, चिपळूण येथील पूरग्रस्त व दरड दुर्घटनेतील आपत्ग्रस्तांना सुमारे ७५ हजार रकमेच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. आपत्ग्रस्तांच्या घरोघरी प्रत्यक्ष जाऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मदत दिली.
अतिमुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील पोसरे या ठिकाणी झालेल्या दरड दुर्घटनेमध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना, तसेच अनाथ व्यक्तींना जिल्हा कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तू प्रत्यक्षरीत्या पुरविण्यात आल्या. खेड, पोसरे, बौद्धवाडी आपत्ग्रस्तांबरोबरच मिरजोळी, जुवाड, गोवळकोट पेठमाप, बौद्धवाडी पिंपळी समर्थनगर, पिंपरी सोनारवाडी, पिंपळी, वडार कॉलनी, सती, खेर्डी, खताते वाडी याशिवाय चिपळूण शहर परिसरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आली. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सचिव विनोद सांगावकर, जिल्हा सहायक सचिव प्रमोद गमरे, दापोली तालुकाध्यक्ष बिपिन मोहिते, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रमेश कांबळे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दिलीप तांबे, चिपळूण तालुकाध्यक्ष देवीदास शिंदे, गुहागर तालुकाध्यक्ष सुधाकर कांबळे, दापोली तालुका कार्यकारिणी सदस्य विजय धनावडे, दापोलीचे नीलेश कराड, संगमेश्वर तालुक्याचे सचिव दादा साबणे, सल्लागार संजय कोरे, रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधी प्रल्हाद सरगर उपस्थित होते.
-------------------------
खेड तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडीतील आपत्ग्रस्त कुटुंबांना जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे व कास्ट्राईब जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.