रत्नागिरी : पानवल ते हातखंबा मार्गावर धावत्या बसमधून तरुण पडल्याने ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. प्रचारासाठी निघालेले आमदार उदय सामंत यांनी गर्दी पहाताच गाडी थांबवली व तत्परतेने जखमी तरुणाला वैद्यकिय उपचार उपलब्ध होण्यासाठी ताबडतोब सुत्रे हलविली.रत्नागिरी बसस्थानकातून रत्नागिरी - लांजा (एमएच-२०-बीएल-१२१७) लांजाकडे धावत होती. हातखंबामार्गे बस जात असताना पानवल फाट्यापासून काही अंतरावर एसटीचा बंद दरवाजा अचानक उघडला. यामुळे दरवाजात उभे असलेल्या गणपत दिनराव गोंधळे (४०, रा. पाली, देवतळे) तोल गेल्याने खाली पडले.
अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवासीदेखील घाबरले. गोंधळे यांच्यासमवेत त्यांची पत्नी वैशालीदेखील प्रवास करीत होती. एकच ओरडा झाल्यानंतर चालकाने तातडीने बस थांबवली. प्रवाशानीदेखील तात्काळ बाहेर येऊन रस्त्याकडेल पडलेल्या गोंधळे यांच्याकडे धाव घेतली. गोंधळे चालत्या बसमधून पडल्याने जखमी झाले होते. अपघातामुळे प्रवासी, ग्रामस्थ, वाहनचालक यांची एकच गर्दी झाली होती.गोंधळे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे गरजेचे होते. त्याच कालावधीत प्रचारासाठी निघालेले आमदार उदय सामंत पालीवरुन रत्नागिरीकडे प्रवास करीत होते. रस्त्याकडेला असलेली गर्दी पहाताच त्यांनी तातडीने गाडी थांबवली व गाडीबाहेर येऊन गर्दीमध्ये शिरले.
जखमी अवस्थेत असलेल्या गोंधळे यांना पहाताच त्यांनी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून तातडीने रुग्णवाहिका अपघातस्थळी बोलवली. त्यानंतर गोंधळे यांना रत्नागिरी येथे वैद्यकिय उपचारासाठी स्थलांतरीत करण्यात आले. आमदार सामंत यांनी प्रचाराच्या गडबडीतही थांबून दाखविलेल्या माणुसकी व कार्यतत्परतेचे जनमानसात कौतुक करण्यात येत आहे.