राजापूर : जूनमध्ये झालेल्या अतिवृष्टीत कोसळलेल्या तालुक्यातील पेंडखळे शाळा क्रमांक १च्या इमारत दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देऊ हे पाहणीअंती लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन केवळ पोकळ ठरले आहे. अद्यापर्यंत या शाळा दुरुस्तीबाबत स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या विरोधात जनआंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, २२ सप्टेंबरला ग्रामस्थांच्यावतीने राजापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पेंडखळे सरपंच राजेश गुरव यांनी दिली.
तालुक्यात १७ जूनला झालेल्या अतिवृष्टीत पेंडखळे गावातील पेंडखळे शाळा क्रमांक १चे छप्पर पूर्णपणे मोडून पडले. त्यानंतर आमदारांसह जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाकडूनही पंचनामा करण्यात आला. या पाहणीनंतर तातडीने या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि शाळेची तत्काळ दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन आमदारांसह सर्वच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी दिले हाेते.
गेल्या चार महिन्यांत याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या शाळेच्या दुरुस्तीसाठी ३ लाख ८२ हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याला ना मंजुरी, ना निधी अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वर्गणी काढून शाळा दुरुस्त करतो, पण शाळा दुरुस्ती लवकर करा, अशी मागणी केली आहे. कोरोना संसर्गामुळे सध्या शाळा बंद आहेत. आता त्या कधीही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर या शाळेच्या इमारतीची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर मग पहिली ते सातवीच्या मुलांना बसवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.