रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुंबईतील श्री सद्गुरू अनिरुद्ध उपासना फाउंडेशनतर्फे श्री सद्गुरू अनिरुद्ध बापू यांच्यावरील अनुभव कथन व भक्ती संगीताचा सत्संग कार्यक्रम आयाेजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवारी हाेणार असून, कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून १० ते १२ हजार भक्तगणांचा जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडा बाजार नाका ते काँग्रेस भुवन मार्गावर सर्व प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.सत्संग कार्यक्रमादरम्यान भक्तगणांची व त्यांच्या वाहनांची परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी काढले आहेत.
या दिवशी पर्यायी मार्ग म्हणून काँग्रेस भुवन–मुरलीधर मंदिर भुते नाका मार्ग आठवडा बाजार या मार्गाचा वापर करावा. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलिस विभागाने करायची आहे, असेही आदेशात म्हटले आहे.