खेड : कामचुकारपणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याच्या रागातून अधिकाऱ्याच्या अंगावर ॲसिडसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन वसंत पाटणे या पुष्कर कंपनीतील कामगाराविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीचे अधिकारी अजयकुमार सिंग यांनी तक्रार दाखल केली आहे. रात्रपाळीच्या वेळी सिंग हे कंपनीतील बॉयलर प्लान्ट पाहणीस आल्यावर काही कामगार झोपलेले हाेते. तर काही जण कामचुकारपणा करताना दिसले. तसा अहवाल त्यांनी वरिष्ठांना दिला. वरिष्ठांना अहवाल दिल्याचा राग धरून पाटणे याने सिंग यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जखमी केले आहे. याप्रकरणी पाटणे याच्यावर पोलिसांनी कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.