दापाेली : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडक लाॅकडाऊन करण्यात आले आहे़. सर्वत्र लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी हाेत असताना, दापाेली समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या काही हॉटेलमध्ये पर्यटक गुपचूप येत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे कडक लाॅकडाऊन करण्यात आले आहे. तसेच नाक्या-नाक्यावर पोलीस पहारा देत आहेत. असे असतानादेखील दापोलीतील काही किनाऱ्यांवर पर्यटक चारचाकी व दुचाकी घेऊन येत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले़. तसेच अनेकजण समुद्रकिनाऱ्यांवर टाईमपास करण्यासाठी रात्री, दिवसा भटकत असल्याचेही सांगण्यात येत आहे़. मात्र अशांवर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त हाेते आहे़. गावात येणारे पर्यटक कुठल्या हॉटेलमध्ये राहत आहेत, गावात येण्यास प्रवेश कसा मिळाला, याची साधी चौकशीही केली जात नाही. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अनेकजण दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन काही ना काही कारणे सांगून सरळ पर्यटन क्षेत्राकडे येत आहेत़. स्थानिक प्रशासन, पोलीस, तालुका प्रशासन यांनी याची दखल घेण्याची मागणी हाेत आहे़.