मंडणगड : निसर्ग चक्रीवादळामुळे माैजे वेळास (ता. मंडणगड) येथील उन्मळून पडलेल्या झाडांची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत पाचजणांनी सहभाग घेतला हाेता.
मंडणगड तालुक्यातील मौजे वेळास गावातील समुद्रकिनारी असणारी एकूण १,९६३ सुरुची झाडे वादळाने उन्मळून पडली होती. त्यांचे १ लाख २ हजार २२३ रुपये मूल्यांकन करण्यात आले होते. त्याची लिलाव प्रक्रिया दि. १७ जूनला घेण्यात आली. यात दापोली, मंदिवली, आजरा (कोल्हापूर) येथील पाचजणांनी सहभाग घेतला. यामध्ये मज्जीद अब्बास चौगुले (रा. केळशी, ता. दापाेली) यांनी १ लाख ७ हजार ५०१ रुपयांना हा लिलाव घेतला. निसर्ग चक्रीवादळात पडलेल्या या झाडांचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना महसूल विभाग, मंडणगड यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार ही लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, वन अधिकारी अनिल दळवी उपस्थित होते.