लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने दहावी, बारावी परीक्षा मे व जूनमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यात दहावीसाठी ७३ व बारावीसाठी ३७ परीक्षा केंद्र आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार तोंडी परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य परीक्षा केंद्राकडे उपलब्ध झाले आहे. मात्र, लेखी परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य परीक्षेपूर्वी एक किंवा दोन दिवस आधी उपलब्ध होत असल्याने लेखी परीक्षेचे साहित्य सध्या बोर्डाकडेच उपलब्ध आहे.
तोंडी परीक्षेसाठी छोटी प्रश्नपत्रिका, मुलांनी उत्तरे दिल्यानंतर गुणांकनासाठी कोरी मार्कशीट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या परीक्षा केंद्राची जबाबदारी वाढली असून प्रश्नपत्रिका व कोरी मार्कशीट सुरक्षित कुलूपबंद कपाटात ठेवण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून शाळा ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. शाळेच्या वर्गखोल्या देण्यात येत असल्या तरी मुख्य शाळेच्या कार्यालयीन इमारतीत बोर्डाकडून उपलब्ध झालेले शैक्षणिक साहित्य सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दहावी, बारावी परीक्षेबाबत बोर्डाकडून नवीन सूचनांची शाळा, शिक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
परीक्षा शाळेत होणार
दहावी व बारावी परीक्षेसाठी स्वतंत्र ११० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, आता शाळास्तरावर परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत बोर्डाकडून अद्याप काही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
ज्या शाळांमध्ये वीसपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर मात्र जवळपासच्या शाळेत एकत्र करीत परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप अंतिम तारखा बोर्डाकडून जाहीर व्हायच्या आहेत. त्यामुळे नवीन तारखा जाहीर झाल्यानंतर परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे.
लेखी परीक्षेसाठी कोऱ्या उत्तरपुस्तिका, पुरवणी आदी साहित्य परीक्षेआधी उपलब्ध होत असते. त्यामुळे सध्या तरी शैक्षणिक साहित्य बोर्डाकडे उपलब्ध आहे. परीक्षा केंद्र, शाळांना बोर्डाकडून सूचनांची प्रतीक्षा आहे. सूचनेनंतरच साहित्य ताब्यात घेतले जाणार आहे.
शैक्षणिक साहित्य बोर्डात सुरक्षित
.. तोंडी परीक्षेच्या संचाची परीक्षा केंद्रात उपलब्धता
.. लेखी परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य अद्याप बोर्डाकडे
.. तोंडी परीक्षा संच सुरक्षितता परीक्षा केंद्राकडे
.. परीक्षा तारखा जाहीर झाल्यानंतरच उत्तरपुस्तिका, पुरवण्या व अन्य साहित्य उपलब्ध होणार
.. परीक्षेबाबत शासन निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा
लेखी परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य अद्याप बोर्डाकडे आहे. केवळ तोंडी परीक्षेसाठीचा संच उपलब्ध झाला आहे. बोर्डाच्या सूचनेनुसार संच सुरक्षित ठेवला आहे. अद्याप परीक्षेच्या तारखा जाहीर नाहीत.
- हुसेन पठाण, मुख्याध्यापक, गुरूवर्य अ. आ. देसाई हायस्कूल, हातखंबा
परीक्षेच्या एक ते दोन दिवस आधी उत्तरपुस्तिका, पुरवणी व अन्य शैक्षणिक साहित्याची उपलब्धता होते. यावर्षी परीक्षा कोरोनामुळे उशिरा होणार आहेत. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुढील सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे.
- गायत्री गुळवणी, मुख्याध्यापिका, रा. भा. शिर्के प्रशाला
शासनाने कोरोनामुळे परीक्षा मे व जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले आहे. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे परीक्षा शाळास्तरावर घेण्याच्या सूचना प्राप्त आहेत. मात्र, ज्या शाळेतील परीक्षार्थींची संख्या वीसपेक्षा कमी आहे, त्या शाळातील मुलांना जवळच्या शाळांमध्ये परीक्षेसाठी पाठविण्यात येणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप सुधारित सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त होताच, त्या पन्धतीने नियोजन केले जाणार आहे.
- एस. व्ही. पाटील,
मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल नेवरे.