रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखीनच चिघळला असून, जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी थेट काँग्रेस भुवन येथील कार्यालयाला टाळे ठोकल्याने वादात आणखीन भर पडली आहे.रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अंतर्गत असणारे गटातटाचे राजकारण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांना शह देण्यासाठी हुसेन दलवाई गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी विजय भोसले यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून टाकली आहे. त्यानंतर रत्नागिरीचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांना व्हॉटस्अॅपवरून मेसेज करून पदमुक्त केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.गुरूवारी सकाळी माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील काही कार्यकर्ते काँग्रेस भुवन येथे गेले होते. यावेळी पक्षाच्या कार्यालयाला नवीन टाळे टोकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर दरवाजावर जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या सहीचे पत्र चिकटविण्यात आले आहे. चावीबाबत संबंधित व्यक्तीकडे माणूस पाठवूनही ते न आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष काँग्रेस भुवनचा सातबारा नावावर झाल्यासारखे वावरत आहेत. शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांना पदमुक्त करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. काँग्रेस पक्ष व्हॉटसअॅपवर चालत नाही.- रमेश कीर,सरचिटणीस प्रदेश काँग्रेस
दरवाजावर चिकटविले पत्रदरवाजावर चिकटविण्यात आलेल्या पत्रामध्ये काँग्रेस भुवन रत्नागिरीच्या चाव्या खालील व्यक्तींकडे उपलब्ध असतील. ज्यांना काँग्रेस भवन पक्ष कार्यासाठी उघडे पाहिजे किंवा इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना हवे असल्यास त्यांनी कामाचे स्वरूप सांगून चावी घ्यावी. असे लिहिण्यात आले आहे.