गुहागर : शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाने दिलेल्या आदेशांनतरही अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील प्रदूषित घरांना पिण्याच्या पाण्याचा तातडीने पुरवठा करण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाने अजूनपर्यंत काहीच हालचाल केलेली नाही. शासनाचा आदेश धुडकावून ग्रामस्थांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
आरजीपीपीएलचे अधिकारी याबाबत केवळ टाळाटाळ करीत असून, काेविडचे कारण सांगून ग्रामस्थ, कंपनी प्रशासन आणि अंजनवेल ग्रामपंचायत यांच्यात हाेणाऱ्या बैठकीबाबत मुद्दाम वेळकाढू धाेरण अवलंबत आहेत. कंपनीचे हे असहकार्याचे धाेरण पाहता पाणी प्रदूषणाबाबत आता शासनाच्या वरिष्ठ पातळीवर दाद मागण्यात येणार आहे. कंपनीच्या वीज निर्मिती प्रक्रियेसाठी अंजनवेलमधील काेनवेल समुद्र भागातून एचडीपीई पाईपच्या माेठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यातील एका लाईनमधून समुद्रातील पाणी पंपाद्वारे कुलिंग टाॅवरला खेचण्यात येते आणि येथील अतिउष्ण झालेले तीन कुलिंग टाॅवरचे टरबाईन थंड करण्यासाठी या पाण्याचा वापर हाेताे. टरबाईनच्या शिथिलीकरणाची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पाईपलाईनद्वारे येथील रसायनयुक्त उष्ण पाणी पुन्हा समुद्रामध्ये साेडण्यात येते. प्रक्रिया करून पूर्ण झालेले हे प्रदूषित पाणी वाहून नेणारी माेठी पाईपलाईन फेब्रुवारी महिन्यात फुटली आहे. त्यामुळे या भागात माेठ्या प्रमाणात पाणी वाहून नैसर्गिक जलस्रोतांच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. परंतु पाईपलाईन नेमकी कुठे फुटली आहे, याची माहिती कंपनी प्रशासनाला अनेक दिवस नव्हती.
चाैकट
सन १९९९ मध्ये एन्राॅनच्या दाभाेळ वीज प्रकल्पामुळे झालेल्या द्रवरुप नाफ्ता गळती या प्रदूषणाच्या गंभीर समस्येबाबत येथील ग्रामस्थांनी कंपनीविराेधात रिट पिटीशन दाखल केल्यानंतर न्यायालयाने प्रदूषणग्रस्त भागाला कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश दिले हाेते. पुन्हा एकदा ताेच पवित्रा अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थ घेण्याच्या पवित्र्यात आहेत.