दापाेली तालुक्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५ काेटी रुपयांची गरज आहे. सध्या २१८ पैकी ६६ शाळांना निधी मंजूर झाला आहे. चिपळूण तालुक्यात १७ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, ८ शाळा धाेकादायक आहेत. लांजा तालुक्यातील ४३ शाळांची किरकाेळ पडझड झाली आहे, तर ४६ शाळांची तातडीने दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे. तालुक्यातील २२ शाळांचा दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
पालकांकडून माहिती
शासनाने काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी शाळांना एक लिंक पाठविण्यात आली आहे. ही लिंक शाळांनी सर्व पालकांना पाठविली आहे. यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत सूचना मागविण्यात आली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
नवीन शाळांनाही गळती
जिल्हा परिषदेच्या काही शाळांची दुरुस्ती करून नव्याने शाळांची उभारणी करण्यात आली आहे. शाळांवर स्लॅब टाकून शाळांचे साैंदर्य वाढविण्यात आले आहे. मात्र, या शाळांनाही आता गळती लागली असून, या शाळांवर प्लास्टिक कापड टाकून ही गळती थांबविण्याची वेळ आली आहे.
मागणी करूनही दुर्लक्ष
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र, ओरी नं. १ शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या शाळेची सध्या अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या शाळेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी माजी विद्यार्थी स्वप्निल दत्ताराम शिंदे, संदीप गंगाराम काेलगे, संजय गंगाराम येलये, सिद्धार्थ गणपत जाधव, प्रतीक संताेष जाधव यांनी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने आज शाळा माेडकळीला आली आहे.