चिपळूण : ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचा पुरस्कार सोहळा उत्साहात झाला. यावेळी विविध मान्यवरांना गौरवण्यात आले.घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना त्यांच्या कर्मयोगी लोकमान्य एक चिकित्सक अभ्यास या ग्रंथाला कवी माधव पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अरविंद तथा अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पद्मगंधा प्रकाशनचे मालक अरुण जाखडे यांना त्यांच्या ‘इर्जिक’ या पुस्तकाला कवी आनंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणातील पाण्याची समस्या आणि उपाय या पुस्तकाला कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांना नाना भागवत पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, श्रीफळ व रोख रक्कम असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप होते. पुरस्काराला उत्तर देताना सर्व लेखकांनी या ग्रंथांची प्रेरणा आपणास का व कशी मिळाली, याचे विवेचन केले. या कार्यक्रमासाठी शिवाजी महाराजांच्या आरमारातील प्रमुख व खांदेरी जलदुर्गाचे बांधकाम प्रमुख माया भाटकर यांच्या बाराव्या पिढीतील वारसदार कॅप्टन दिलीप भाटकर उपस्थित होते. त्यांनी दर्यावर्दी वारसा आपण कसा जपतो आहोत, हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले, तर समारोप संचालक अरुण इंगावले यांनी केले. कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी नियोजन केले. कार्यक्रमासाठी वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
लोकमान्य वाचनालयाचा पुरस्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2015 10:09 PM