लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र, दापोलीचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष विष्णू सावर्डेकर यांना ‘फेलो ऑफ द सोसायटी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय समुद्रतटीय कृषी संशोधन संस्था, परगणा, पश्चिम बंगाल या संस्थेमाफत आभासी माध्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादावेळी हा पुरस्कार डॉ. सावर्डेकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, उपसंचालक भाकूअनुप डॉ. एस. के. चोधरी, ऑस्ट्रेलियाचे कृषी उच्चायुक्त डॉ. ल्युक योक, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर संस्थेचे पदाधिकारी आणि इतर संशोधक उपस्थित होते.
डॉ. सावर्डेकर यांनी खार जमिनीसाठी पनवेल--३ भाताची जात विकसित केली असून, क्षार प्रतिकारक भात जातीचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये केला आहे. उतीसंवर्धन तत्राचा वापर करून त्यांनी नाचणीची पहिली जात विकसित केली आहे. डॉ. सावर्डेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. उत्तम महाडकर आणि विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.