दापोली : काेराेनाबाबत जनजागृती करण्यासाठी शासनातर्फे जनजागृती महाअभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत चित्ररथ तयार करण्यात आला असून, हा रथ दापाेलीत दाखल झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून तालुक्यात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
रिजनल आऊटरिच ब्युरो महाराष्ट्र - गोवा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ व कोविडपासून घ्यावयाची काळजी, लसीकरण जनजागृतीसाठी महाअभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला आहे. चिपळूण तालुक्यातून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
काेल्हापूर येथील श्री संगम लोकधारा सामाजिक प्रतिष्ठानने अभिनयाचे नेतृत्व केले आहे. चित्ररथाचे वाहक म्हणून चक्रधर अर्जुन जाधव काम करत आहेत. हा चित्ररथ दापाेलीत दाखल झाला आहे. त्यानंतर हा चित्ररथ गुहागर, खेड, मंडणगड, राजापूर, लांजा, संगमेश्वर, देवरुख, गणपतीपुळे येथे पोहोचणार आहे, अशी माहिती श्री संगम लोकधाराचे अध्यक्ष शाहीर दिलीप आत्माराम सुतार यांनी दिली़.
------------------------
स्वत:बराेबर समाजाचीही सुरक्षितता
मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायझर किंवा साबणाने आपले हात वारंवार स्वच्छ धुवा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, घरी राहा सुरक्षित राहा याविषयी जनजागृती केली. रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांत जनजागृती करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत. स्वत:च्या सुरक्षेसोबतच समाजाच्या सुरक्षेसाठी कलाकार धडपडत आहेत.