अडरे : चिपळूण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती भयानक होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शासनासह येथील प्रशासन, आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीने वाडी वस्तीवार विविध ठिकाणी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी कंबर कसली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अत्यावशयक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यापारावर निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाही विविध उपक्रम राबवित आहेत. तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात विविध ठिकाणी फलक लावून जनजागृती केली आहे. तसेच राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनची माहिती दिली जात आहे. सरपंच सुनील सावंत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. राज्य सरकारने केलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. कोरोनाला गावच्या वेशीबाहेरच ठेवावे यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन सरपंच सावंत यांनी केले आहे. या जनजागृती उपक्रमात पोलीस पाटील चंद्रकांत शिगवण व सर्व कर्मचारी सहभागी झाले हाेते.