कामांना प्रारंभ
राजापूर : तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटातील सन २०१९-२० अंतर्गत २५१५ योजनेअंतर्गत वडदहसोळ गीतयेवाडी ते होळीचा मांड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ओणी बाैध्दवाडी ते कोंडवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मंदरूळ झरेवाडी ते जड्यार देव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
रस्त्याची कामे सुरु
चिपळूण : चिपळूण - कराड मार्गावर बहादूरशेख नाका ते पिंपरी खुर्द रस्त्याची अर्धवट कामे अखेर सुरु झाली आहेत. गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत आहे. जोड रस्त्याची कामे खेर्डी, पिंपळी, सती येथे रखडली होती.
दुकाने सुरुच
रत्नागिरी : राज्य शासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून दिवसभर व्यापारी दुकाने उघडी ठेवत आहेत. शहरापासून जवळ असलेल्या गावातून दुकानामध्ये गर्दी होत आहे.
रक्तदान शिबिर
रत्नागिरी : तालुक्यातील संस्कार नेहरु युवा मंडळ झरेवाडीच्या बाराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या उपक्रमातील चौदावे व कोविड १९ मधील तिसरे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ऑनलाईन मार्गदर्शन
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत भात संकलन केंद्र, कर्जत व अखिल भारतीय समन्वयक मसाले पीक संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पूर्व लागवडीचे नियोजन, भात, हळद लागवडीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले.
घरपाेहोच सेवा
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे. दुकानातील होणारी गर्दी टाळण्यासाठी नगर परिषद हद्दीतील किराणा मालाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त ग्राहकांना घरपाेहोच सेवा देण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे.
मोबाईल नेटवर्क ठप्प
राजापूर : तालुक्यातील विल्ये, पडवे गावासह परिसरामध्ये बीएसएनएल बरोबरच खासगी कंपन्यांच्या नेटवर्क सेवेचा बोजवारा उडाला आहे. सेवा ठप्प असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. बँका तसेच शासकीय कार्यालयातील कामांवर याचा परिणाम होत आहे. ग्राहकांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहेत.
लसीकरण सुविधा
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बोंड्ये व बेलारी या दोन उपकेंद्रातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सेनेचे युवा कार्यकर्ते व माजी सरपंच सचिन मांगले यांनी ही सुविधा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे.
साहित्य वाटप
राजापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखेतर्फे रायपाटण कोरोना केंद्रातील रुग्णांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये स्टीमर, इलेक्ट्रिक किटली, स्टीलची ताटे, ग्लास, साबण, मेणबत्ती, मच्छर अगरबत्ती व अन्य साहित्य वितरित करण्यात आले. रुग्णसंख्या वाढल्याने सुविधा अपुऱ्या असल्याने साहित्याचे वाटप करण्यात आले.
पिग्मी एजंट संकटात
रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. आता ते १५ तारखेपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पिग्मी एजंट व्यवसायही ठप्प झाला आहे. गतवर्षी देखील लॉकडाऊनमुळे पिग्मी एजंटांना फटका बसला होता. पिग्मी मिळणे बंद झाल्याने त्यांना मिळणारे कमिशनही बंद झाले आहे.
निर्जंतुकीकरण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये ग्रामपंचायतीतर्फे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण गावात महत्वाच्या ठिकाणी करण्यात आले. शासनाचे नियमांचे पालन करुन ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच सोनल चव्हाण, उपसरपंच संदेश कात्रे यांनी केले आहे.