अविनाश कोळी
सांगली : कोरोना काळात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या, हवा शुद्ध करणाऱ्या इनडोअर रोपांना सध्या मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी असलेल्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दरमहा जिल्ह्यात ५० लाखांहून अधिक इनडोअर रोपांची आवक होऊ लागली आहे.जिल्ह्यात सध्या लोणावळा, पुणे, कोकण परिसरातून मोठ्या प्रमाणावर इनडोअर रोपे येऊ लागली आहेत. दिवसा ऑक्सिजन देणाऱ्या व रात्री ऑक्सिजन घेणाऱ्या झाडांपेक्षा चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या व घरातील वातावरणात जगणाऱ्या वनस्पतींना अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात याची गेल्या सात महिन्यांत कोट्यवधीची उलाढाल झाली असून, मागणी आणखी वाढण्याचा नर्सरी मालकांचा अंदाज आहे. अंगणातील रोपांची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील अनेक नर्सरी मालकांनी आता इनडोअर नर्सरी सुरू केल्या आहेत.हवेच्या शुद्धीकरणाबरोबरच यातील काही वनस्पतींची पाने, फुले आकर्षक असल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस ग्राहकांची मागणी वाढत आहे.सांगलीतील नर्सरीमालक जयंत साळुंखे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षा घरात चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या रोपांना ५० टक्के अधिक मागणी आहे. याशिवाय कमी देखभाल असल्यानेही त्यास पसंती मिळत आहे.घरातल्या बागांना अधिक पसंतीअपार्टमेंट, दाटीवाटीच्या जागांमुळे अनेकांच्या वाट्याला अंगण येत नाही. त्यामुळे ते आता इनडोअर बागा, टेरेस बागा फुलविण्यात रमले आहेत. इनडोअर रोपांची फार देखभाल करावी लागत नाही. घरातील सजावटीलाही त्याचा उपयोग होतो. सध्या मागणी असलेल्या इनडोअर रोपांच्या किमती शंभर रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहेत. स्वस्त व महागड्या अशा दोन्ही रोपांना मागणी वाढत असल्याचा विक्रेत्यांचा अनुभव आहे.या इनडोअर वनस्पतींना आहे मागणी...अॅँथेरियम, मॉन्स्टेरा, अरेलिया, ड्रॅकेना मिल्कीवे, आर्चिड, डायफेनबाचिया, पेपरोमिया, मनी प्लांट, पीस लिली, स्नेक प्लांट, तुळशी, स्पायडर प्लांट, एरेका पाम यांना अधिक मागणी आहे. इमारतींच्या दाटीवाटीत राहणाऱ्या अनेक फ्लॅटमध्ये होणारी घुसमट हवा शुद्ध ठेवणाऱ्या रोपांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत.