खेड : येथील पोलीस ठाण्यांतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्र येथील पोलीसांनी लोटेतील झोपडपट्टीतील नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले होते. यात हॅण्डवॉश, सॅनिटायझर मास्क आणि साबणाचा समावेश होता.
जवानांचा गौरव
खेड : येथील मदत ग्रुपने कोरोना संकटात पोलीसांना मदतीचा हात देणाऱ्या गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान केला. यात संजय कडू, निकित आंब्रे, जाकीर तडवी, नवनाथ घोलप, केतन पेवेकर, विक्री सुर्वे, रेश्मा दांडेकर, उदय मोरे आदी जवानांना सन्मानपत्राने गौरव करण्यात आला.
ग्रामस्थांतून समाधान व्यक्त
राजापूर : एप्रिल महिन्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या ओहत. तालुक्यातील अनेक दुर्गम भागांना आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील मोसम, सरवणकरवाडी येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुले मोबाइलच्या आहारी
मंडणगड : कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर मुले घरातच बसलेली आहेत. मात्र, आता शाळाही ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या मुलांच्या हातात सहजगत्या मोबाइल आला आहे. त्यामुळे अभ्यासाच्या नावाखाली ही मुले सतत मोबाइलवर व्यग्र राहू लागली आहेत. सध्या या मुलांचे खेळही थांबले आहेत.
मुंबईकरांना वेध
राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना आता आपल्या गावी येण्याचे वेध लागले आहेत. काही कोकण रेल्वे, तसेच काही खासगी गाड्यांमधून गावी येण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हळूहळू मे महिन्यात पुन्हा ही संख्या वाढण्यास सुरुवात होणार आहे.
माळवदे यांचे यश
देवरुख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. रमेश गोपाळ याने द्वितीय तर अर्चना माळवदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
वॉर्डबॉयची भरती
दापोली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य खात्यात आता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डात काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने वॉर्डबॉयची पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश भागवत यांनी केले आहे.
गाळ उपशाची मागणी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री, सोनवी नदीप्रमाणे असावी, नदीचे पात्रही गाळाने भरलेले आहे. गाळ उपसा होत नसल्याने संगमेश्वर बाजारपेठ, तसेच जवळच्या गावांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होतो. या पुरामुळे बाजारपेठेचे, तसेच लगतच्या गावांमधील घरांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे गाळ उपसा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
योगासनाचे धडे
खेड : शहरातील खांबतळ्याजवळील शिवतेज आरोग्यसेवा संस्थेच्या इमारतीतील कोविड सेंटरमध्ये सध्या रुग्णांना योगासनाचे धडे देण्यात येत असून, त्यांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. रुग्णांचा मानसिक ताण दूर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.परेश मळणगावकर यांच्याकडून योगाचे प्रात्यक्षिकही घेण्यात येत आहे.
अखेर तलाठी नियुक्त
राजापूर : तालुक्यातील तुळसवडे सजातील गावांना पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कायमस्वरूपी तलाठी मिळाला आहे. या ग्रामस्थांची उत्पन्नाच्या दाखल्यासह अन्य शासकीय कामे रखडली होती, तसेच अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी आवश्यक असलेल्या ७/१२ साठी वणवण करावी लागत होती. अखेर ही गैरसोय दूर झाली आहे.