खेड : शहरातील सोनारआळी मित्रमंडळाने रंगपंचमीचे औचित्य साधून पथनाट्यातून कोरोना जनजागृती केली. यावेळी मास्कचेही वाटप करण्यात आले. तीन बत्ती नाका, सोनारआळी, बाजारपेठ आदी ठिकाणी ही पथनाट्ये सादर करण्यात आली. यावेळी कोरोनाविषयक खबरदारीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
उन्हाचा फटका
रत्नागिरी : वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने त्याचा परिणाम भाजी, फळे यावर होऊ लागला आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. उन्हाने पालाभाजी तसेच वेली सुकू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
वानरांचा उपद्रव
राजापूर : तालुक्यातील मळेशेती व आंबा - काजू बागेमध्ये माकडे व वानरांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले आहेत. सद्य स्थितीत अनेक गावांमधून शेतकऱ्यांची कुळीथ काढणी आणि झोडणी संपत आली आहे. तसेच आंबा व काजूच्या बागा यातूनदेखील उत्पन्न घेत आहेत. आधीच वातावरणाच्या प्रतिकूल परिणामाचा फटका बसत असतानाच वानरही बागायतींचे नुकसान करीत आहेत.
वार्षिक संमेलन
मंडणगड : तालुक्यातील दाभट येथील मदरसा दारुल मसाकींचे वार्षिक संमेलन नुकतेच घेण्यात आले. अध्यक्षस्थानी पेशीमाम मौलाना अश्रफ धतुरे हे होते. सचिव मन्सूर जुवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पाणी टंचाईच्या झळा
चिपळूण : कडक उन्हाळा सुरु झाल्याने तालुक्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेला दूरवरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील धामणवणे आणि टेरव या गावांनाही तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. या दोन गावांना खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
लसीकरणाला गती
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. शिमगोत्सवाच्या काळात मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे संसर्ग जलदगतीने फैलावू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धसका ग्रामस्थांनी घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने आता लोक लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.
डांबरीकरणाला प्रारंभ
पावस : गेले वर्षभर रखडललेल्या कोळंबे ते पावस या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहन चालक हैराण झाले होते. परिसरातील ग्रामस्थांमधूनही खड्डे बुजविण्याची मागणी होत होती. अखेर या मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे.
पोलिसांवर ताण
रत्नागिरी : शहरातील सिग्नल यंत्रणा अधूनमधून बंदच असते. जेलनाका, मारुती मंदिर या ठिकाणी सायंकाळी गर्दीच्या वेळी हे दोन्ही सिग्नल बरेचदा बंद असतात. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. बरेचदा एकच पोलीस या ठिकाणी नियंत्रण करत असतो. सकाळी तसेच सायंकाळी या दोनवेळी नियंत्रण करताना कसरत करावी लागते.
विजेचा लपंडाव वाढला
मंडणगड : सध्या कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. अशातच आता विजेचा लपंडाव दिवसभर सुरु झाला आहे. अधूनमधून वीज गायब होत असल्याने त्याचा परिणाम अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांवर होत आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने यासाठी कुटुंबामागे ठराविक रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.