शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.सुरुवातीला त्यांच्या मनावरही दडपण होते. काहींच्या घरातील व्यक्तींनी तर ही नोकरी सोड, असे भीतीपोटी निर्वाणीने सांगितले. पण ही सेवा देशसेवा आहे, असे समजून ते आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत.
हे करत असताना घरातील वयस्कर आई, वडील, पत्नी, मुलं यांच्या सुरक्षिततेची काळजी असतेच. त्यामुळे घरी आल्यावर बाहेरच आंघोळ करून कपडे निर्जंतुक करून घरात प्रवेश होतो. घरातल्यांपासून अलिप्त रहावे लागते. त्यामुळेच कोरोनापासून सुरक्षित रहाता आले. कोरोनाने शेवटच्या क्षणी दूर केले. मात्र, हे कर्मचारी माणुसकीच्या भावनेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.
सुरुवातीला भीती होती. पण लोकसेवेची ही संधी आहे, असं समजून रात्री अपरात्री कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो. वयस्कर आई, पत्नी, लहान मुलगी यांची चिंता होती. १४ दिवस त्यांच्यापासून लांब रहायचो. कोरोना मृताला अग्नी देताना वाईट वाटायचं. काही वेळा रडलोही आहे. वर्षभरात सण स्मशानातच साजरे झाले.- ज्ञानेश कदम, कर्मचारी
कोरोनाची भीती होती. पण या रूग्णांवर अंत्यसंस्कार करायला कुणीच तयार नव्हतं. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने कुणीतरी पुढे यायला हवंच होतं आणि ड्यूटीचा भाग म्हणून हे काम करणे क्रमप्राप्तच होते. मात्र, ते करताना घरच्या मंडळींची आणि आमचीही काळजी घेत आहोत.- संजय मकवाना, कर्मचारी
कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करताना सुरुवातीला आपल्या सुरक्षिततेविषयी भीती वाटली. पण त्यानंतर कर्तव्याचा भाग म्हणून ते करू लागलो. आतापर्यंत शेकडो मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे करताना माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेत असतो.- प्रीतम कांबळे, कर्मचारी