चिपळूण : खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती डुगवेतील खवलोत्सवाची. बा गावदेवी आमच्या गावात खवले मांजर आहे, त्याचे रक्षण कर, त्यांची संख्या वाढव, तसेच तस्करी, चोरटा व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे, जगातील सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांनी खवले मांजराच्या रक्षणाची शपथ घेतली.कोकणात सध्या खवले मांजर या प्राण्याच्या चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले असून, वेळोवेळी त्याच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत आहेत. मात्र, चिपळूण तालुक्यातील डुगवे गावातील ग्रामस्थ मात्र या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी सरसावले आहेत.
या गावात चक्क खवलोत्सव म्हणजेच खवले मांजर महोत्सव साजरा करण्यात आला आहे. डुगवे या लहानशा गावानेदेखील खवले मांजर संरक्षणाचे काम करण्याचा विडा उचलला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जागतिक खवले मांजर दिनानिमित्त १५ फेब्रुवारी रोजी डुगवे गावामध्ये खवलोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाला सावर्डे येथील वनपाल राजश्री कीर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डुगवेच्या सरपंच नेहा तांडकर, माजी सरपंच महेंद्र कदम, उपसरपंच चंद्रकांत तांडकर, पोलीसपाटील श्रीधर कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयराम कदम, देवस्थानाचे मानकरी रमाकांत पाटकर, राजेंद्र अंतरकर, भागोजी तांडकर, चंद्रकांत साखरकर, सीताराम तांडकर, विठ्ठल तांडकर, राजाराम कदम, सह्याद्री निसर्गमित्रचे कार्यकर्ते, वन विभाग व पोलिसांचे सहकार्य लाभले.प्रतिकृतीची पालखीखवलोत्सवानिमित्त खवले मांजराची प्रतिकृती ठेवून गावातून पालखी सजविण्यात आली होती. ही पालखी घराघरात फिरवण्यात आली. ग्रामस्थांनी भक्तिभावाने खवलेमांजराचे औंक्षण केले. पालखी परत सहाणेवर बसली, तेथे खेळे/ नमन सादर करण्यात आले. त्यात खवल्याचे सोंगसुद्धा आले. कार्यक्रमाच्या शेवटी डुगवे ग्रामस्थ, सह्याद्री निसर्गमित्रचे कार्यकर्ते, वन विभाग, पोलीस या सर्वांच्यावतीने ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले.