रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्था हातखंबा व खेडझी रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थेतील सर्व मुलांनी बुध्दवंदना व त्रिसरण पंचशिल यांचे पठण केले. या जयंतीच्या निमिताने संस्थेतील प्रवेशितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग नाटिकारूपाने सादर करून त्यांचा समाजपरिवर्तनाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवला,
चवदार तळ्याचा सत्याग्रह, तसेच भीमराव आंबेडकर व हार्डिकर यांच्यामधील संवाद आदी प्रसंगातून समता व मानवी प्रतिष्ठा या विचारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापितांविरोधी कसा लढा दिला, हे प्रवेशितांच्या नाटिकेतून सादर केले.
संस्थेतील सानिका धुमाळ व युवराज सांगलळोतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार व महिलांसाठी केलेले कार्य याची माहिती दिली. मंजिरी गुरव, रजिया शेख, शीतल हिवराळे यांनी बाबासाहेबांचे गीत सादर केले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या मीरा गायकवाड, शीतल हिवराळे, शिल्पा डांगे, सीता मिश्रा, रामदास पाटील, नंदिनी पाटील, विजया कांबळे, अशिष मुळये व प्रवेशित उपस्थित होते.
फोटो मजकूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मीरा गायकवाड, शीतल हिवराळे, शिल्पा डांगे, सीता मिश्रा व रामदास पाटील उपस्थित होते.