रत्नागिरी : जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी होतो. मात्र, जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोनामुक्त झाले असूनही प्लाझ्मादानासाठी पुढे येण्यास अनुत्सुक दिसत आहेत.
कारवाईचा बडगा
रत्नागिरी : लाॅकडाऊन सुरू होताच पोलिसांनी हेल्मेट तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतुकीचे नियम तसेच कोरोनाच्या अनुषंगाने आता कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
नागरिकांची धावपळ सुरू
चिपळूण : जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन सुरू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लाॅकडाऊन राहणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व वस्तूंच्या खरेदीकडे वळले आहेत.
बी - बियाणांचे वाटप
लांजा : माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने स्थानिक युवकांना लागवडीसाठी वेगवेगळ्या नऊ प्रकारांतील भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या संस्थेचे अध्यक्ष विवेक सावंत यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
शैक्षणिक साहित्याचे वाटप
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ ला समत्व ट्रस्ट ठाणे (मुंबई) यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रिंटर, स्कॅनर आदी साहित्य या शाळेला देण्यात आले.
व्यापाऱ्यांची नाराजी कायम
मंडणगड : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केले आहे. गेल्या लाॅकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, आता पुन्हा लाॅकडाऊन सुरू झाल्याने सर्वच व्यापारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
पुलावर जाळ्या
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर आता रेल्वे विनाअडथळा सुरू राहावी, तसेच रेल्वे रुळावर होणारे अपघात व आत्महत्या थांबाव्यात, यादृष्टीने कोकण रेल्वे महामंडळाने पुलाच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या उभारल्या आहेत.
शिमगोत्सव साधेपणाने
दापोली : यावर्षी सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शिमगोत्सवावरही ते कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमगोत्सव यावर्षी काेरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
काजू बीदरात घसरण
गुहागर : काजू बीची आवक वाढल्यानंतर आता तिच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीला किलोला १२० - १३० रुपये असलेला दर आता अवघ्या ८५ ते ९० रुपयांवर आला आहे.
पर्यटकांची पाठ
दापोली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने लाॅकडाऊनचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाच्या अनुषंगाने लावण्यात आलेले नियम व अटी यामुळे आता तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पाठ फिरू लागली आहे.