चिपळूण : गणेश विसर्जन झाल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून चिपळूण एस. टी. स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन येथे परतीच्या प्रवाशांची गर्दी फुलली होती.गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या गणेशभक्तांनी गणेश विसर्जनानंतर आपला परतीचा प्रवास सुरु केला आहे. मुंबई, मुुंबई उपनगर, ठाणे, पुणे व इतर भागात जाणाºया प्रवाशांसाठी एस. टी. महामंडळाने चिपळूण आगारातून २६५पेक्षा जास्त गाड्या सोडल्या आहेत. याशिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना बस पुरविण्याची व्यवस्था केली आहे. या सर्व बस खचाखच भरुन जात आहेत. ग्रामीण भागातूनही येणाºया गाड्या प्रवाशांनी भरुन येत आहेत. त्यामुळे एस. टी. आगारात मोठी गर्दी आहे.एस. टी. आगाराप्रमाणे चिपळूण रेल्वे स्टेशनवरही मोठी गर्दी आहे. रेल्वे स्टेशनवर पाय ठेवायलाही जागा नाही. रेल्वे सेवा थोडी विस्कळीत असली तरी गाड्या नियमित धावत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता.गुरुवारी रात्री मात्र काही गाड्यांचे दरवाजे उघडले जात नसल्याने प्रवाशांनी कल्ला केला होता. मात्र, गाड्यांना गर्दीच खूप असल्याने प्रवाशांचाही नाईलाज होता. गाड्यांचे दरवाजे उघडले न गेल्याने अनेकांना वेळेत जाता आले नाही, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसत होते.मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सोयीची पडत असल्याने परतीच्या प्रवाशांचा कल रेल्वेकडे अधिक वाढल्याचे दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरही रात्रीपासून मोठी गर्दी होती. खासगी वाहनांच्या तसेच बसच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बहादूरशेख नाका, पाग पॉवर हाऊस, फरशी तिठा यासह अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.