मेहरून नाकाडे रत्नागिरी : राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर घोंघावनाऱ्या ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रायगड, पालघर, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याला ५ रोजी सुट्टी जाहीर केली. रात्री ८.३०च्या सुमारास सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी, पालकांपर्यंत सुट्टीचा संदेश व्हॉट्सअॅपमुळे पोहोचला. त्यामुळे ९९ टक्के विद्यार्थी सुटीमुळे घरी थांबले. अवघा एक टक्का विद्यार्थी सकाळी शाळेत पोहोचले. तत्पूर्वीच अध्यापकवर्ग शाळेत उपस्थित होता. त्यांनी शाळेला सुटी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना घरी पाठवले.सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस होता. सकाळच्या व दुपारच्या सत्रातील शाळा दैनंदिन कामकाजानंतर वेळेवर सोडण्यात आल्या. ओखी वादळाचा प्रभाव असल्यामुळे सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी पाऊस झाला.
किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहात होते. मंगळवारी दिवसभर वादळाचा परिणाम राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली. मात्र, सुट्टी रात्री ८.३०च्या सुमारास घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत संदेश कसा पोहोचवावा, याबाबत मुख्याध्यापक, शिक्षकांनी चर्चा केली.शहरातील अनेक विद्यार्थी रिक्षा, व्हॅन, स्कूलबसव्दारे शाळेत येतात. त्यांना शाळेत सोडणाऱ्या चालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. अनेक शिक्षकांकडे त्या चालकांचे नंबर असल्यामुळे चालकांच्या व्हॉट्सअॅपग्रुपवर प्रथम संदेश टाकण्यात आला. त्यानंतर बहुतांश शाळेत शिक्षक - पालक संघ आहेत.
प्रत्येक वर्गातील पालकाची निवड संघावर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक - पालक संघाच्या ग्रुपवर प्रथम संदेश देण्यात आला. पालकांच्या प्रतिनिधींनी शालेय सूचनांसाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपवर पालक प्रतिनिधींनी संदेश पाठवला. त्यामुळे रात्री ९ ते ९.३० पर्यंत बहुतांश पालकांना सुट्टीचा संदेश देण्यात आला. अनेक पालकांनी माहितीच्या शिक्षकांना विचारून खात्री करून घेतली.
अनेक शैक्षणिक संस्थांच्या आस्थापनांनी शाळा, महाविद्यालयांच्या सूचना फलकावर सुट्टीची नोटीस रात्रीच लावली होती. शिवाय वॉचमनला रात्रीच कल्पना दिली होती. शहरातील अनेक शाळा महाविद्यालये सकाळच्या सत्रात भरतात. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येणारे आहेत. अनेक गावात मोबाईल पोहोचले असले तरी काही गावातील मोबाईल रेंज गायब आहे.
टीव्हीमुळेही अनेकांना सुट्टीची माहिती मिळाली होती. परंतु उर्वरित एक टक्क्यामध्ये जे विद्यार्थी आले त्यांच्यासाठी शाळेतील शिक्षकवर्ग सकाळी ६.३० वाजल्यापासून शाळेत उपस्थित होता. प्रवेशव्दारावर उभे राहून विद्यार्थ्यांना सुट्टीचे सांगून घरी पाठविण्यात आले.