मंडणगड : शहरातील आशापुरा स्वीटस् काॅर्नर बेकरीला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. ही आग शाॅर्टसर्किटने लागल्याचा अंदाज असून, या आगीत १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना काल, शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्री १:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आगीमुळे शहरात आगीचे तांडव पाहायला मिळाले.मंडणगड शहरातील मुख्य चौकातील व शासकीय धान्य गोदामाच्या नजीक जिवाराम चाैधरी यांच्या मालकीची आशापुरा बेकरी आहे. या बेकरीतून मध्यरात्री धूर येत असल्याचे बसस्थानक परिसरातील एका रिक्षा चालकाने पाहिले. त्याने तातडीने याबाबत पोलिस व काही नागरिकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पाेलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धावत घेत आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बेकरीच्या मुख्य दरवाजाचे शटर व छाताचे पत्रे काढण्यापूर्वीचे आगीने राैद्ररुप धारण केले हाेते. त्यामुळे आग आटाेक्यात आणणे अवघड झाले हाेते.आग आटाेक्यात आणण्यासाठी खेड येथील अग्नीशमन यंत्रणेला बाेलावण्यात आले. मात्र, त्यापूर्वी आगीत बेकारीचे पदार्थ, काऊंटर, सर्व फर्निचर व अन्य वस्तू जळून खाक झाले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की नाही यावर महावितरणकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. संबंधित यंत्रणा त्याबाबत तपास करत आहे.
मंडणगडात बेकरीला आग, आगीत दुकान जळून खाक; १० ते १२ लाखांचे नुकसान
By अरुण आडिवरेकर | Published: March 18, 2023 3:26 PM