रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राला भेट दिली. कृषी केंद्रात होणाऱ्या भाताविषयीच्या संशोधनाविषयी माने यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि विक्रमी भात उत्पादन करून त्याची विक्री झाली पाहिजे या हेतूने त्यांनी चर्चा केली.
या केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. दळवी यांच्याशी चर्चा करताना माने यांनी ब्लॅक राइस, लाल तांदूळ, रत्नागिरी ८ व भाताच्या अनेक संकरित वाणाविषयी चर्चा केली. भाताचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात माहिती घेतली. या अनुषंगाने रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाने पंतप्रधान भात पीक स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती माने यांनी दिली. पाणीपुरवठा असणाऱ्या ठिकाणी उन्हाळी भातशेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यानंतर डॉ. दळवी यांच्यासोबत भात प्रक्षेत्राची पाहणी माने यांनी केली. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यामुळे बळीराजाविषयी ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे मत माने यांनी व्यक्त केले. या वेळी माने यांनी डॉ. दळवी यांच्यासह कृषी पर्यवेक्षक डॉ. एन.जे. सोनोने, कृषी सहायक आर.डी. सावंत तसेच कृषी प्रक्षेत्रावर लागवड करणाऱ्या शेतकरी महिलांचे आभार मानले.