चिपळूण : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुखांच्या शुभेच्छांचा फलक फाडण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. शेकडो शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला आहे. या फलक प्रकरणावरून चिपळूणमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.युवकचे तालुकाप्रमुख निहार कोवळे यांनी तत्काळ त्याच ठिकाणी फलक लावला आहे. फलक फाडणाऱ्यांचा शोध बुधवारी घेतला जात होता. पोलिस ठाण्यातही कारवाईसाठी निवेदन देण्यात येणार आहे. ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, मर्दाची अवलाद असाल तर समोर येऊन फलक फाडून दाखवा, असे थेट आव्हान निहार कोवळे यांनी दिले आहे.बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेकजण दाखल झाले आहेत. या संघटनेचे नूतन तालुकाप्रमुख संदेश ऊर्फ बापू आयरे यांच्या स्वागताचे फलक काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे फलक काही दिवस सुरक्षित होते. मात्र, त्या फलकचे विद्रुपीकरण करण्यात आले.फलक फाडल्याचे आणि विद्रुपीकरण केल्याचे समजताच युवा तालुकप्रमुख निहार कोवळे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ विकी लवेकर, अंकुश आवळे, सचिन शेट्ये, सचिन हातीसकर, विशाल नरलकर, शुभम कदम, अमेय चितळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते वालोपे या ठिकाणी सायंकाळी उशिरा गोळा झाले होते. युवा तालुकाप्रमुख निहार कोवळे यांची युवा टीम दाखल झाली होती.या फलकावर स्व. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते. विद्रुपीकरण केलेले फलक सन्मानाने काढून ठेवण्यात आले आणि त्याच जागेवर नवे फलक तत्काळ शिवसैनिकांनी लावले. फलकावरून बाळासाहेबांची शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
कोकणातील राजकीय वातावरण तापणार, चिपळूणमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फलक फाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 5:27 PM