असगोली : गुहागर तालुक्यातील वरवेली येथे श्री हसलाई देवी मंदिर व सहाणेच्या मध्यभागी रस्त्यावरून गेलेल्या वीजवाहिन्या रस्त्यापासून १३ फुटाच्या अंतरावर आल्या असून, एस. टी. येताना जाताना त्या लागू नयेत म्हणून ग्रामस्थांनी वीजवाहिन्यांना लाकडी बांबूंचा टेकू दिला आहे.
या मार्गावरून सतत एस. टी. तसेच मोठ्या वाहनांची वर्दळ असते. अनेक वाहनांना या वीजवाहिन्यांचा स्पर्श होतो. त्यामुळे तेथे सतत स्पार्किंग होत असते. तोच प्रकार वरवेली शाळा क्र. १ येथे होतो. तेथेही वीजवाहिन्या रस्त्यालगत लोंबकळत आहेत. तसेच जितेंद्र विचारे यांच्या जमिनीतून गेलेली मुख्य वीजवाहिनी कधीही तुटू शकते. त्यामुळे या ठिकाणी गंभीर अपघात होऊ शकतो. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा महावितरणच्या गुहागर कार्यालयात संपर्क साधूनही काहीच कार्यवाही झालेली नाही.
वरवेली गावात अनेक वीजखांब वादळात वाकले आहेत. ते अजून बदलण्यात आलेले नाहीत. दोन्ही वीज खांबाच्या मधील अंतर जास्त असल्याने अनेक वीजवाहिन्या जमिनीलगत लोंबकळत आहेत. पावसामुळे झाडाच्या फांद्या, वेली झुडपे वाहिन्यांवर आली आहेत, पावसाळ्याअगोदर वीजवाहिन्यांवरील झाडी-झुडपे, वेली न तोडल्यामुळे त्याचा परिणाम वीज खंडित होण्यावर होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अनेक निवेदने महावितरणच्या गुहागर कार्यालयात दिली; परंतु एकही अधिकारी वस्तुस्थिती पाहण्यास आलेला नाही. अधिकाऱ्यांकडून लोकांना चांगला प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे गावात विजेमध्ये बिघाड झाला किंवा वीज खंडित झाल्यास नेमकी तक्रार कुठे करायची, हा प्रश्न लोकांना पडतो. लाइनमन कधीच गावात राहत नाहीत. मोबाइलवर संपर्क केल्यास तो नेहमी बंद असतो. एखाद्या ग्राहकाने बिल भरले नसल्यास मीटर कनेक्शन तोडण्यासाठी लाइनमन ग्राहकाच्या घरी धावतात; परंतु ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कोणी येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमधील रोष वाढत चालला आहे.