लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शासकीय आरोग्य यंत्रणेत तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे असून, त्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शासकीय आरोग्य यंत्रणेत बीएएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर काम करीत आहेत. मुळात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने शासनाने हा पर्याय काढला आहे; मात्र एमबीबीएस अधिकारी मिळाले की, याठिकाणी सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना बाजूला केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक बीएएमएस डॉक्टरांनी आमदार निकम यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडून न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला असून, कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे.
आमदार निकम यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीत सरकारी सेवेत असणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे आहे; मात्र त्याबरोबर बीएएमएस डॉक्टरांचे योगदानही विसरता न येणारे आहे. अनेक ठिकाणी याच डॉक्टरांनी आरोग्य सेवेची बाजू सांभाळली आहे. कोरोना महामारीत यांचे ही योगदान मोठे आहे. त्यामुळे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण सेवेतून बाजूला करण्यापेक्षा ज्या ठिकाणी गरज असेल तेथे त्यांना सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात येऊ शकते. यासाठी त्यांना प्रथम कायमस्वरूपी सेवेत समविष्ठ करून घेण्यात यावे, अशी मागणी निकम यांनी केली आहे.