लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : श्री संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे करण्यात आली आहे़ याबाबतचे निवेदन रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गिरीश कुबेर यांनी ‘रिनेइसेन्स स्टेट’ या नावाने श्री संभाजीराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित केले आहे. यामध्ये संभाजीराजांच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह लिखाण केले गेले आहे. त्यांनी पुरावेहीन व लांच्छनास्पद कोणताही अभ्यास न करता स्वत:च्या स्वार्थापोटी लिखाण केले आहे. हे अतिशय निषेधार्ह आहे.
शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे आपल्या देशाची अस्मिता आहेत व अस्मिता कधी उदरनिर्वाहाचे किंवा प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नसते, अशी भावना शिवशंभुभक्तांची आहे़ गिरीश कुबेर यांनी स्वत: कुबेर होण्यासाठी किंवा समाजामध्ये जाणीवपूर्वक संभाजीराजांबद्दल दुराग्रह निर्माण होण्यासाठी हे लिखाण केल्याचा आराेप करण्यात आला आहे. या पुस्तकावर बंदी घालावी तसेच तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा, रस्त्यावर उतरण्याचा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने दिला आहे.
यावेळी सुशील कदम, चंद्रकांत राऊळ, गणेश गायकवाड, सचिन नानिवडेकर व संग्राम आरेकर उपस्थित होते.
-----------------------
वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले़