मंडणगड : गेल्या दाेन वर्षांत तालुक्यातील सर्वच एटीएम केंद्र वीकेंडला बंद राहत असल्याने तालुक्यातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी या समस्येकडे डोळेझाक केल्याने पैशाअभावी नागरिकांची होणारी अडचण गेल्या दोन वर्षांपासून बँकांचे लक्षात का आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मंडणगड तालुक्यात शहरासह कुंबळे, पंदेरी, म्हाप्रळ या ठिकाणी सर्वच बँकांची एटीएम केंद्रे कार्यरत आहे. आठवड्याच्या शेवटच्या म्हणजे शनिवार व रविवार या दोन दिवसांत एटीएम केंद्र बंद ठेवण्याचा शिरस्था बँक व्यवस्थापनांनी घालून दिला आहे. ही परिस्थिती कोरोनाच्या काळात आणखी गंभीर झाली आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस तालुक्यातील सर्वच एटीएम केंद्र पैसे नसणे, इंटरनेट बंद असणे, आदी कारणामुळे बंद असतात. या संदर्भात स्थानिक व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणत्याही सुधारणा होत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
-----------------------------
मंडणगड तालुक्यातील एटीएम केंद्राबाहेर बंदचे असे फलक लावण्यात आले आहेत. (छाया : प्रशांत सुर्वे)