देवरुख : जिल्ह्यात शुक्रवारपासून सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानंतर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, देवरूखातील एका व्यापाऱ्याने चक्क दुकानाबाहेर अजब फलक लावला आहे. या फलकावर घरपाेच सेवा देण्याबराेबरच ‘बँकांनी कर्ज वसुलीसाठी तर व्यापाऱ्यांनी वसुलीसाठी येऊ नये,’ असे लिहिले आहे. त्यामुळे हा फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. त्यानंतर काही दिवसांतच सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. गुरुवारी (१५ एप्रिल) रात्री उशिराने याबाबतचे आदेश काढण्यात आले आणि शुक्रवारी अचानक बाजारपेठ बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या आदेशानंतर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. याचाच उद्रेक म्हणून एका व्यापाऱ्याने फलक लावून अनोखा फंडा वापरला. अचानक लादलेल्या या निर्बंधाच्या रागातूनच व्यापाऱ्याने हा फलक लिहिला हाेता.
या फलकावर ‘जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दुकान बंद आहे. ग्राहकांनी दुकानासमोर उभे राहू नये. दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा, माल घरपोच होईल.’ त्याचबरोबर असेही लिहिले आहे की ‘बँकेने कर्ज हप्ता वसुलीसाठी येऊ नये, तसेच व्यापाऱ्यांनी वसुलीसाठी येऊ नये.’ देवरूखातील व्यापाऱ्याने लावलेल्या या अनाेख्या फलकाची जाेरदार चर्चा सुरू आहे.
.................................
सर्वच दुकाने बंद करण्याच्या आदेशानंतर देवरूखातील व्यापाऱ्याने दुकानाबाहेर अजब फलक लिहिला आहे.