रत्नागिरी : कुटरे ग्रामपंचायतीचा (ता. चिपळूण) तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सुभाष दिनकर हुलवान याला नोकरीतून बडतर्फ कल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली. साडेपाच वर्षांपूर्वी हुलवान याने लाच घेतली होती. त्यावेळी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ग्रामविकास अधिकारी हुलवान याला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, त्याला ७ आॅगस्ट २००९ रोजी अटक केली होती. अटक झाल्यानंतर हुलवान याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याला चिपळूण पंचायत समितीमध्ये अकार्यकारी पदावर पुन:स्थापित करण्यात आले होते. याच दरम्यान हुलवान याला खेड न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सुभाष हुलवान याने उच्च न्यायालयात अपील करून या शिक्षेस स्थगिती मिळवली होती. जिल्हा परिषदेने हुलवान प्रकरणी शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. अखेर खेड न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अंतर्गत नियम ९ (२) व ४ (६) नुसार सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. (शहर वार्ताहर)
लाचप्रकरणी अधिकारी बडतर्फ
By admin | Published: March 12, 2015 11:47 PM