विनोद पवार -
राजापूर : शहरापासून सुमारे सात किलोमीटरच्या अंतरावर सापडलेल्या कातळशिल्पांमुळे राजापूर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर चमकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातही बारसूचे एक कातळशिल्प युनेस्कोच्या प्राथमिक यादीत स्थान मिळवणारे ठरले असून, या कातळशिल्पाचा योग्य पद्धतीने अभ्यास झाल्यास इसवीसनपूर्व मानल्या जाणाऱ्या इंडसव्हॅली, मिश्र (इजिप्त), मेसोपोटेमियन (इराण इराक) व चायना संस्कृतीचा उगम राजापूर बारसू येथूनच झाल्याचे उघड होण्यास वेळ लागणार नाही. या इसवीसनपूर्व संस्कृतीमध्ये सापडलेल्या सीलचे रेखाटन बारसूच्या कातळशिल्पावर सापडल्याने इतिहास अभ्यासकांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. मानवाच्या इतिहासाचा अभ्यास करताना आज इंडसव्हॅली, मिश्र म्हणजे आताचे इजिप्त, मेसो पोटॅमियन म्हणजे आजचे इराण इराक व चीन या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. इंडसव्हॅलीमधील मोहंजोदडो व हडप्पा या संस्कृती अतिशय विकसित मानल्या जातात. या संस्कृतीशी साधर्म्य असलेले चित्र बारसूच्या सड्यावर कोरलेले आहे. एक मानव आपल्या दोन्ही हातांनी दोन वाघांच्या मानेला धरून उभा असल्याचे हे चित्र मोहेंजोदडो, इजिप्त, इराक - इराण व चीन इथे सापडलेल्या सीलवरील चित्राशी साधर्म्य आहे. या संस्कृतीत सापडलेली सील ही त्यावेळी चालणाऱ्या व्यापाराची प्रतिके मानली जातात, असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. या चार प्राचीन संस्कृतींमध्ये व्यापारी संबंध होते. बऱ्याच वेळा त्यावेळी कातडी बॅगमधून महत्त्वाच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवल्या जायच्या व त्यावेळी त्यावर सील लावले जायचे. ही सील चौकोनी आकाराची असत. ही सील टेराकोटा व अन्य प्रकारात तयार केलेली असत व त्यावर विशिष्ट फोटो अथवा चित्र असायचे. ही सर्व सील व त्यावरील दोन्ही बाजूच्या वाघांच्या मानेला पकडून उभा असलेला मानव याचे मूळ चित्र बारसूच्या कातळसड्यावर सापडणे म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचा पाया इथूनच असेल का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जागतिक इतिहासकारांंनी बारसूमधूनच अभ्यासाला सुरुवात केल्यास वावगे ठरणार नाही.