लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मारहाण आणि अपहरणाच्या आराेपाखाली पिंपरी - चिंचवड पाेलीस शाेध घेत असलेल्या आमदार आण्णा बनसाेडे यांच्या मुलाला काेळंबे (ता. रत्नागिरी) येथून साथीदारांसह ताब्यात घेण्यात आले. वेळाेवेळी जागा बदलून पाेलिसांना गुंगारा देणाऱ्या आमदार पुत्र सिद्धार्थ बनसाेडे याच्या माेबाईल लाेकेशनवरून अखेर त्याला पकडण्यात यश आले. तब्बल ४० तास सलग पाठपुरावा करून पाेलिसांनी चाैघांच्या मुसक्या आवळल्या.
पिंपरी - चिंचवड येथील मारहाण आणि अपहरणप्रकरणी निगडी पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आण्णा बनसाेडे यांचा मुलगा सिद्धार्थ याचाही समावेश हाेता. मात्र, ही घटना घडल्यानंतर सिद्धार्थ आपल्या साथीदारांसह तेथून फरार झाला. आमदार पुत्र असल्याने याप्रकरणी राजकीय दबाव तंत्राचा वापर करण्यात येत हाेता. मात्र, पाेलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धारच केला. त्यामुळे पाेलिसांनी त्याचा शाेध घेण्यास सुरूवात केली. आमदार पुत्र सिद्धार्थ आणि त्याच्या साथीदारांनी पिंपरी - चिंचवड येथून पळ काढल्याचे कळताच त्याच्या माेबाईल लाेकेशनद्वारे शाेध घेण्यास सुरुवात केली.
या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पाेलीस निरीक्षक लक्ष्मण साेनवणे यांनी जमा केलेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे सर्वजण उरण (जि. रायगड) येथे असल्याचे कळले. पथकाच्या दाेन टीम उरणकडे निघताच त्याची माहिती सिद्धार्थला मिळाली़ व त्यांनी तेथून पलायन केले.
पाेलीस आपला पाठलाग करत असल्याचे कळताच त्यांनी पाेलिसांना गुंगारा देण्यास सुरूवात केली. त्याचवेळी त्यांनी वाकडी, न्यू पनवेल येथील फार्म हाऊसवर गेल्याचा बनाव रचला. तेथे पाेलिसांचे पथक पाेहाेचल्यानंतर हा सर्व बनाव असल्याचे लक्षात आले. तेथे मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण रत्नागिरीतील काेळंबे येथील एका बंगल्यात आल्याचे कळले. हे सर्वजण सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान काेळंबे येथे पाेहाेचले हाेते. त्यांच्या माेबाईल लाेकेशननुसार पाठलाग करून काेळंबे येथे आलेल्या पाेलिसांनी सापळा रचून २६ मे राेजी दुपारी १ वाजता सिद्धार्थसह चाैघांना ताब्यात घेतले.
------------------------
मित्राच्या मित्राचा बंगला
सिद्धार्थ बनसाेडे आणि त्याचे साथीदार काेळंबे येथील लक्ष्मीनगर येथील ‘श्रमसाफल्य’ या बंगल्यात येऊन राहिले हाेते. हा बंगला सिद्धार्थच्या मित्राच्या मित्राचा असल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. या बंगल्याचे मालक दिवा येथे राहत असल्याने हा बंगला रिकामाच असताे. त्यामुळे लपून बसण्यासाठी त्याने या बंगल्याचा आधार घेतला.
------------------------
नातेवाईकांना खाेटी माहिती
उरण येथून पलायन करताच सिद्धार्थने खाेटी माहिती पसरवण्यास सुरूवात केली़ त्यात त्याने न्यू पनवेल येथील फार्म हाऊसवर जात असल्याचा बनाव रचला़ त्याच्या नातेवाईकांकडे पाेलीस चाैकशी करणार हे ओळखून त्याने पनवेल येथील लाेकेशन नातेवाईकांना पाठविले़ तसेच फार्म हाऊसवर खाेली बुक करून तेथे जेवणही तयार ठेवण्यास सांगितले़ जेणेकरून पाेलिसांचा तपास तेथे जाऊन थांबावा़