खेड : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले असून, मराठा समाजाच्या दृष्टीने ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या घटनेने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. मराठा आरक्षणाची लढाई यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र, कोरोना काळात आंदोलकांनी संयम राखावा, असे आवाहन मराठा समाजाचे नेते तथा मराठा सेवा संघ खेडचे संस्थापक केशवराव भोसले यांनी केले आहे.
केशवराव भोसले यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समाजातील अबालवृद्ध तरुण-तरुणींनी एक विचाराने, एक मताने लाखोंच्या संख्येने एकंदर ५५ मूक मोर्चे काढले. मराठा समाजातील तरुणांना, तरुणींना शैक्षणिक व नोकरीत सवलत मिळावी त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून अनेक तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी तरुण-तरुणींचे नव्हे तर माझ्यासारखे ७५ वर्षांचे शेलारमामा आपल्या सोबत राहतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, राज्य सरकारने आपली बाजू यशस्वीपणे मांडली. परंतु, त्याला यश आले नाही असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. आता निकालावर आक्रोश करून चालणार नाही. कारण राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्याचा प्रयत्न करून मराठा तरुणांची माथी भडकविण्याचे काम पद्धतशीरपणे करतील. त्यामुळे उद्रेक होईल असे काही करू नका. त्यामुळे मराठा समाजाचे नुकसान होईल याचा विचार करा. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक निष्पाप माणसांचे बळी जात आहेत. संसर्ग वाढतो आहे. हा संसर्ग वाढण्याचे पाप आपल्या माथी घेऊ नका. संयमाने वागा. कोरोनाला पळवून लावण्यासाठी एकजुटीने सहकार्य करा. आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सरकारला पळती भुई थोडी करून आरक्षण मिळवूच ही जिद्द ठेवूया, असे भोसले यांनी सांगितले.