रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी एकूण ७६ दिवसांपेक्षा जास्त दिवस सुट्टी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना शिक्षण संचालकांनी सर्व शाळांना दिली आहे़
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी, यासाठी शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षासाठी सुट्यांची निश्चिती करण्यात येते़ विदर्भ विभागाव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित विभागातील सर्व शाळा उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, १७ जूनपासून सुरु होणार आहेत़
शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांची सुट्टी शिक्षणाधिकाºयांच्या परवानगीने घेता येणार आहे़ मात्र, माध्यमिक शाळा संहिता नियम ५२़५नुसार शैक्षणिक वर्षातील सर्वप्रकारच्या सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत़, याची दक्षता घेण्याची सूचना शिक्षण संचालकांनी केली आहे़
तसेच मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील स्थानिक सुट्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित करुन शिक्षणाधिकाºयांना कळवणे आवश्यक आहे़ जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्या तसेच शासन स्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या सर्व सार्वजनिक सुट्या शाळांनी घेणे बंधनकारक आहे़
सर्व शासकीय सुट्या तसेच स्थानिक सुट्या विचारात घेऊन सुट्यांच्या कालावधीची निश्चितता झाल्यानंतर प्रत्येक शाळेत किमान २३० दिवस शालेय कामकाज चालेल, अशा पध्दतीने वार्षिक कालदर्शिका त्या-त्या शिक्षणाधिकाºयांनी तयार करण्याचे आदेशही शिक्षण संचालकांनी दिले आहेत़
प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर हे कर्मचारी वगळून इतर शिक्षकेतर कर्मचाºयांना दीर्घ सुट्या अनुज्ञेय नाहीत़ मात्र, दीर्घ सुट्टीच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्या असतील, त्या शिक्षकेतर कर्मचाºयांना अनुज्ञेय राहणार आहेत, असेही शिक्षण संचालकांनी आदेशात म्हटले आहे़