रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आरोग्य यंत्रणेतील इतका मोठा बदल कधीही घडला नव्हता. आता शासकीय रुग्णालयांना स्वयंस्फूर्ती येताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा यानिमित्ताने उपलब्ध झाल्या. एवढेच नव्हे तर रत्नागिरी कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करताना ऑक्सिजनचा प्लांटही उभारला जात आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी सुरु आहे. तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्याही वाढवली जात आहे. उत्तर रत्नागिरीतील खेड, दापोली व गुहागर येथील आरोग्य यंत्रणेत मोठे बदल होताना दिसत आहेत. येथे तर काही खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोरोना केअर सेंटर सुरु झाले आहे. तसेच अन्य सुविधांचाही विचार होत आहे. इतक्या वर्षांत संबंधित तालुक्यांना उपचाराच्या बाबतीत रत्नागिरी व चिपळूणवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता हे तालुकेही आरोग्य सुविधांच्या दृष्टीने परिपूर्ण होताना दिसत आहेत. हा बदल भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. खासगी डॉक्टरांकडून एकत्रित येऊन सामाजिकदृष्ट्या योगदान देण्याचा विचार केला जात आहे. याचाच अर्थ आता आरोग्यासंदर्भात नवी क्रांती घडण्याची वेळ आली आहे. चिपळुणातही अनेक डॉक्टर कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना केअर सेंटरसाठी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करण्यापासून अन्य सुविधा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र, नेहमीच वेगळेपण दाखवून देणारे चिपळूणचे राजकारण अशाही परिस्थितीत आडवे येत आहे. कोरोना केअर सेंटरविषयी नगर परिषदेचीच भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, चिपळूण नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी अजूनही कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत, तर प्रशासन स्वतःहून पावलं उचलायला तयार नाही. खरंतर सुमारे २०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या चिपळूण नगर परिषदेला काहीही कठीण नाही. परंतु, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. या आधीच्या काही घडामोडी व अनुभवांमुळे प्रशासन कोरोना केअर सेंटरविषयी फार गांभीर्याने विचार करत नसावे. परंतु, लोकप्रतिनिधींनी विशेषतः नगराध्यक्षा व नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकजूट दाखवण्याची गरज आहे. तरच प्रशासन सकारात्मक विचार करू शकतो. अर्थात प्रत्येकानेच आरोग्य सुविधांच्या बाबतीत ‘बी पॉझिटिव्ह’ होण्याची गरज आहे.
- संदीप बांद्रे