पावस : कोकणात पर्यटन वाढीसाठी भरपूर सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. परंतु, त्यावर योग्य सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक कमी प्रमाणात येतात, तसेच काही समुद्रकिनारे पर्यटकांना माहिती नसल्याने दुर्लक्षित राहतात. त्यामुळे रोजगार आणि पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मंडळ विविध उपक्रम राबवत आहे, असे मत अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख व गोळप ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश काळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे १०० सुरुच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. काळे म्हणाले की, आपल्या गावातील किनारे स्वच्छ राखण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या सुरू लागवडीतून किनाऱ्याची धूप थांबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच वायंगणी समुद्रकिनारा येथे पर्यटनातून रोजगार वाढीसाठी याची नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या वृक्षाराेपण कार्यक्रमाला अनुलोम भाग जनसेवक रवींद्र भोवड, जनसेवा सामजिक मंडळ प्रमुख अविनाश काळे, सचिव समित घुडे, स्थानमित्र महेश पालकर, अदिती काळे, ग्रामस्थ प्रवीण राड्ये, जनार्दन खाडे, ओमप्रकाश गोगटे, अवंती काळे, मीनल घुडे, अद्वैत काळे, चैतन्य पटवर्धन उपस्थित होते.