रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे वातावरण होते. अखेर प्रांताधिकारी, पोलीस आणि व्यापारी यांची चर्चा झाली आणि साडेबावीस मीटर ऐवजी पंधरा मीटर मोजणी करण्यावर तडजोड करण्यात आली.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक वाढत असल्याने या मार्गाचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा २२.५ मीटर इतके अंतर सोडण्यास कुवारबाव ते हातखंबा या भागातील व्यापारी, ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी बंदही पुकारण्यात आला होता. व्यापारी व ग्रामस्थांच्या हरकतीवरील निकाल लागेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा २२.५ मीटरऐवजी १५ मीटर इतकी मोजणी करण्यावर तडजोड झाली होती. त्यामुळे मोजणीसाठी आज बुधवारचा दिवस निश्चित करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात मोजणी सुरू झाली ती २२.५ मीटर क्षेत्राची. त्यामुळे व्यापारी, ग्रामस्थांनी विरोध केला. त्यातून काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अखेर आधी निश्चित केल्याप्रमाणे दुतर्फा १५ मीटर क्षेत्राची मोजणी केली जाईल, असे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी स्पष्ट केल्यानंतर मोजणी सुरू झाली.