लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यात केवळ दोन कोरोना हॉस्पिटल असल्याने रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाबाधित लोकांना आता बेड मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना हॉस्पिटल वाढविण्याची मागणी केले जात आहे.
तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येऊन रुग्णांना योग्य उपचार मिळणे कठीण बनले आहे. त्याही परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
दापोली तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डी. सी. एच. सी. सेंटर आहे. या सेंटरमध्ये २८ बेड उपलब्ध असून, त्यातील १८ बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे. येथील भागवत खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये २२ बेड असून, सर्वांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नवीन रुग्णांना उपचाराकरिता बेड मिळणे कठीण झाले आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन किसान भवन येथील बंद झालेले कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे ५५ बेड्सची क्षमता आहे. मात्र तेथे एकाही बेडला ऑक्सिजन सुविधा नाही. यातील बहुतांश बेड फुल्ल आहेत. दापोली शहराबरोबरच तालुक्यातील बहुतेक गावातही आता रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयातील सेंटरमधील बेड वाढवण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. २८ बेड्सचे हॉस्पिटल आता ४८ बेड्सचे होणार आहे. दापोली नगर पंचायतीच्या बहुउद्देशीय इमारतीमध्येही हॉस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवन येथील कोविड केअर सेंटरची क्षमताही संपल्याने आता शाळा, महाविद्यालय ताब्यात घ्यावे लागणार आहे.
दापोली उपजिल्हा रुग्णालय
क्षमता - २८ बेड्स
ऑक्सिजन - १८ बेड्स
......
भागवत खासगी हॉस्पिटल
क्षमता - २२ बेड्स
(सर्व ऑक्सिजन बेड्स)
....................
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील बेड कमी पडत आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलला कोविडची मान्यता देऊन हॉस्पिटल्सची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याचवेळी उपजिल्हा रुग्णालयातील बेड्सची क्षमता वाढविण्याचा आपला प्रयत्न सुरू असून, लवकरच येथील बेड्सची क्षमता ४८ केली जाणार आहे.
- डॉ. महेश भागवत, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, दापोली