रत्नागिरी : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी चंद्रदर्शनानंतर तरावीह नमाज अदा करण्यात आला.
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे चंद्रदर्शनानंतर रमजान मुबारकचे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर सुरू झाला. आखाती प्रदेशात मंगळवारपासून रमजान सुरू झाला आहे. भारतात बुधवारपासून रमजानला प्रारंभ झाला. सर्व मुस्लीम भाविकांनी बुधवारी पहाटे सहेरी करून रोजे ठेवले आहेत. संपूर्ण रमजान मासामध्ये भाविक रोजे ठेवत असल्याने सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही ग्रहण केला जात नाही. रोजे ठेवत असतानाच भाविक कुराण पठण व नमाज पठणही सुरू ठेवतात.
संपूर्ण महिनाभर मुस्लीम मोहल्यामध्ये धार्मिक वातावरण असते. तरावीह नमाजमध्ये कुराण पठण केले जात असल्यामुळे मशिदीमध्ये विशेष मौलवीची नियुक्ती करण्यात येते. मात्र सोशल डिस्टन्सिंग व शासनाचे आदेशाचे पालन करून मौलवीवगळता सर्व भाविक आपापल्या घरातच नमाज अदा करीत आहेत.
दिवसभर अन्नपाणी वर्ज्य करण्यात येत असल्यामुळे सहरीसाठी हलकासा आहार घेण्यात येतो. त्यासाठी दूध, ब्रेड, बटर, सॉस, जाम, श्रीखंड, आमरस, आम्रखंड, फ्रूटखंड, शेवया, सुकामेवा यांचा खप विशेष होतो. बासमती तांदूळ, गहू, आटा, साखर, मैदा, छोले, विविध प्रकारची सरबते, मिल्कमेड, दूध पावडर, कस्टर्ड पावडर, चायनाग्रास, फालूदामिक्स याची प्राधान्याने खरेदी करण्यात येत आहे. इफ्तारसाठी फळांचे व खजुराचे सेवन केले जात असल्यामुळे खजूर, फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सफरचंद, पेर, चिकू, मोसंबी, संत्री, पपई, केळी, आंबे, डाळिंब, टरबूज आदी प्रकारची फळे विक्री सुरू आहे. याशिवाय काळा खजूर, सीडलेस खजूर, विदेशी खजूर बाजारात उपलब्ध आहे. ग्राहकांकडून फळे व खजूर आवर्जून खरेदी करण्यात येत आहे.
रमजानमध्ये पावाचा खप सर्वाधिक होत असल्यामुळे बेकरी व्यावसायिक दिवसातून दोन वेळा पाव तयार करत आहे. दुकानातूनही पाव, मस्का पाव, डोनेट, ब्रेड, नान, पिझ्झा बेस, सामोसा पट्टी, स्प्रिंगरोल पट्टी यांना विशेष मागणी होत आहे.