गणपतीपुळे : लेखक, कलावंत वा अन्य कोणत्याही बौद्धीक क्षेत्रातील लोक केवळ आपल्यापुरतेच पाहून स्वान्तसुखाय जगत असल्याचे चित्र दिसते. समाजातील काही मूठभर लोकांना का होईना, पण या गोष्टीची टोचणी आहे. वैयक्तिक मान, सन्मानाच्या पलिकडे जात समाजाच्या व्यापक भल्यासाठी ते काहीतरी कृ ती करु पहात आहेत, हे चित्र निश्चितच दिलासादायक आहे. अशावेळी समाजवादाची मुळे मानणाऱ्या आपण सर्व सजग भारतीय नागरिकांनीही या पुरस्कार परत करणाऱ्या मान्यवरांच्या मागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे परखड मत संमेलनाध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले. ते गणपतीपुळे येथे सहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या संदर्भात विचार करताना वाटतं की, सांस्कृ तिक वैशिष्ट्यांचे वेगळेपण आजच्या जागतिकीकरणाच्या झंझावातात टिकून ठेवण्याच्या दृष्टीने समाजातील ज्या काही घटकांना ठोस भूमिका घेऊन गंभीरपणे काही करता येण्यासारखं आहे. त्या घटकात शिक्षक आणि लेखकांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. कालपरवापर्यंत आपल्या समाजात लेखक आणि शिक्षक यांच्याविषयीचा अंत्यस्थ आदर आणि त्यांचा समाजमनावर काहीएक नैतिक धाक असलेला दिसून येत होता. त्यामागे जी काही महत्वाची कारणे होती, त्यातील प्रमुख कारण अर्थातच हे लेखक किंवा शिक्षक व्यवस्थेच्या, सरकारच्या किंवा कुणाच्याही दावणीला बांधले गेले नव्हते. मूठभर व्यक्तिगत स्वार्थासाठी आपली शिक्षक वा लेखक ही ओळख विकली गेली नव्हती, अशा शब्दात बांदेकर यांनी खंत व्यक्त केली. चारित्र, साधनसुचिता, नैतिकता यांच्यासारख्या मूल्यांना ते जीवापाड जपत होते हेच दिसून येईल. आज परिस्थिती दोन्ही बाजूला बदलून गेली आहे. विकणारे आणि विकत घेणारे यांचा चेहरा एकच होऊन गेला आहे. वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या नावाखाली सामान्य लोकांच्या जगण्यात हस्तक्षेप करताना ज्यांच्या जमिनी जाताहेत, ज्यांच्या रोजीरोटीच्या साधनांवर गदा येतेय असे शेतकरी, मच्छीमार, सामान्य लोक आपापल्या अस्तित्वासाठी संघर्ष करु लागलेले गावागावातून दिसून येत आहेत. पण अशा मूकसमुहाच्या आक्रोशाला शब्द देण्यासाठी त्यांच्या बरोबरीने लढ्यात उतरण्यासाठी किती बुद्धीजीवी पांढरपेशे लेखक, कवी, शिक्षक, प्राध्यापक आज दिसताहेत, हेही विचार करण्यासारखेच आहे. म्हणूनच शिक्षक आणि साहित्यिक हे दोनच घटक असे आहेत की, जे या बिघडत चाललेल्या काळाला वेसण घालू शकतात. खडू आणि लेखणीमध्ये तलवारी आणि बंदूकांपेक्षाही जास्त सामर्थ्य आहे, हे आजवरच्या इतिहासावरुन वेळोवेळी सिद्ध झाले असल्याचे प्रा. प्रवीण बांदेकर यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर) माणूस अन् डुक्कर आज जॉर्ज आॅरवेल या लेखकाच्या ‘अॅनिमल फॉर्म’ या रुपकात्मक कांदबरीची आठवण होते. माणसाच्या शोषणाच्या विरोधात बंड करुन उठलेले प्राणी विशेषत: त्यातील डुकरं आपलं प्राणीपण विसरुन हळूहळू माणसाचं अनुकरण करु लागतात. माणसात उठबस करु लागतात. त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करणं, त्यांच्यासोबत जुगार खेळणं, नशापाणी, पार्ट्या करणे वगैरेही सुरु होते. शेवटी एकवेळ अशी येते की, डुकराचं नेतृत्व मान्य केलेल्या अन्य प्राण्यांना आता डुक्कर कुठले आणि माणसे कुठली हेच कळेनासं होत. इतकी या दोन्ही परस्पर भिन्न वृत्तीच्या गोष्टींची सरमिसळ होऊन गेलेली असते. काहीसं तसचं ज्ञानदान करणारे आणि या गोष्टींना बाजारात मांडणारे या दोहोंच्या बाबतीतही घडू लागलंय की काय, अशी एक भीती वाटत असल्याचे बांदेकर म्हणाले.
पुरस्कार परत करणाऱ्यांमागे रहा
By admin | Published: March 27, 2016 1:03 AM