रत्नागिरी : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणीच लाभार्थी नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३५ हजार १४१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९३ लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र अद्याप १२ हजार ५३ शेतकरी प्रतिक्षा यादीमध्ये आहेत. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ पर्यत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.
शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्ह्यातील त्यातील १४ हजार ९८८ शेतकऱ्यांना ४५ कोटी ८५ लाखाचे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.सन्मान योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यत कर्ज माफी व दीड लाख वरील शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजना लागू केली होती. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण ४२४ शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजनेतंर्गत ३ कोटी ८४ लाखाची कर्जमाफीचा लाभ मिळाली आहे.शासनाने २०१५-१६ व २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या एकूण १९ हजार ७२९ शेतकऱ्यांना १९ कोटी २५ लाख रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे.बचतगटातील महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी सणासाठी जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या सदस्यांसाठी माऊली बचतगट खावटी कर्ज योजना सुरु केली असून गटांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी रु. ३ लाख पर्यंतचे कर्ज वितरण करण्यात येते. याशिवाय ९२१७ शेतकऱ्यांना शेतीपूरक खावटी कर्ज देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिकतर्फे खावटी कर्ज योजना १९७८ पासून राबविण्यात येत आहे. राज्य सरकार खावटी कर्ज योजना राबविताना ३० टक्के अनुदान व ७० टक्के कर्ज या पध्दतीने कर्ज वितरण करीत असते. रत्नागिरी जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यातून या प्रकारचे कर्ज वितरण होत आहे. शेतकऱ्यांना लावणी किंवा पेरणीसाठी तात्काळ कर्ज वितरणासाठी खावटी कर्ज देण्यात येते. सातबारावरील जमिनीप्रमाणे कर्ज वितरण करण्यात येते (हेक्टरी ४० हजार कर्ज देण्यात येते. २० हजाराची मर्यादा आहे)
शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण ३५ हजार १४१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९३ लाखची कर्जमाफी मिळाली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्हा बँकेचे २६ हजार ३८० लाभार्थी असून ३२ कोटी १८ लाख ३२ हजाराची कर्जमाफी मिळाली आहे. राष्ट्रीयकृत २०२२ शेतकरी असून ६ कोटी ९० लाख २६ हजाराची कर्जमाफी देण्यात आली आहे. जिल्हा बँकेकडून खावटी कर्जाऐवजी सुधारीत पिक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे.- जीवन गांगण,कार्यकारी संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक